top of page

SiddhiVinayak Padyatra

असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार.

सिध्दीविनायक महागणपती राजा तुझ्या चरणकमली मला निरंतर स्थान दे.तुझ्या कृपेला खरोखरच अंत नाही.तुझ्या अस्तित्त्वाची श्वासागणिक साक्ष पटते.

बालपणी आई आज्जी म्हणायच्या की आपल्या कुठल्याही कार्यात थोडासा देवाचा वाटा जास्तीचा असतोच.देव भरभरून देतो.जीवनातले चांगले वाईट क्षण जगताना याची प्रचिती आली.आमच्याबरोबर जन्मापासून सोबत होती ती संस्कारांची शिदोरी.आणि जीवन जगताना कुठल्याही मोहात न पडता नेटाने या शिदोरी चा सांभाळ केला .ते फक्त आणि फक्त तुझ्या वरील नितांत श्रध्दा व ठाम विश्वास या बळावर.कुठल्याही सुखदुःखात हा विश्वास तिळभरही कमी झाला नाही.कारण तो विश्वास कायमच तू खरा ठरवलास.सुख व दु:ख दोन्ही काकणभर जास्तच ओंजळीत टाकले..सुखात सोबतीने आनंदाचे चांदणे पसरवलेस.तर दु:खात साथ एवढी घट्ट की भक्ताने जीव ओवाळून टाकावा. खरी गंमत तर अशी आज आम्हां दोघी मैत्रिणींचा २१पदयात्रांचा सत्यसंकल्प तुझ्या प्रेमाने पूर्ण झाला.या भक्तीमय प्रवासाची ओढ इतर सख्यांनाही लागत गेली.जमेल तसे आमच्या सह सहप्रवासी म्हणून चालत राहिल्या.आणि इथेही एक अंगारकी यात्रा जास्तीची म्हणून तू माझ्याकडून करुन घेतलीच.आणि आजचा २२वा सुवर्णक्षण ओंजळीत टाकलास. बाप्पा तुझ्या प्रत्येक गोष्टीचं भक्तांना अप्रुप असतं.माझं तर तू छान गोंडस बाळ आहे.तुझ्या प्रत्येक बाळलिलेने मी हरखते.आजच्या दिवशी खूप अंत:करणा्पासून वाटतं होतं तुला मनसोक्त खव्याचे मोदक भरवावेत. सगळ्यांची आरतीसाठी लगबग.मला मात्र छान स्वादिष्ट खवामोदक घ्यायचे होतेे. बाळ वाट पहात होतं ना .मनासारखा तुझा खाऊ घेऊन मंदिरात शिरले.खूप आनंदाचा क्षण.बरोबरीच्या दोघी गाभाऱ्यात दोघी सोबत.पण माझी सर्व गात्र एकवटली होती.ती खव्याच्या मोदकांची आतुरतेने वाट पहाणाऱ्या गणेशाला केव्हा मोदक भरवते याकडे.आरतीचा स्तुतीसुमनांचावर्षाव सुरु झाला.पण मी माझ्यात होते कुठे.डोळे बंद .मी मोदक भरवत होते व बाळ अधाशा सारखे गपागप खाऊ खात होते.

न भूतो न भविष्यति असा हा सुवर्णक्षण. आरती झाली.डोळे उघड‌ले.आत्मतृप्तीचा आनंद समोर साक्षात ठाकला होता.गाभाऱ्यात पुजाऱ्यांच्या हातात पेढ्यांचा पुडा दिला.त्यांनी पटकन सर्व मोदक काढून घेतले व प्रसादरुपी पाच मोदक परत दिले. पण बाप्पा आपण दोघं मात्र एकमेकांकडे पाहून दिलखुलास हसलो.आपली गंमत त्यांना कशी कळणार?

खूप खूप गोड खाऊ खाल्ला आहेस .आता चतुर्थी मुहूर्ताची पुजा पण संपली आहे.आता शांतपणे आराम कर रे राजा. लवकर लवकर घरी ये.खूप वाट पहात आहोत सर्व.

गणपती बाप्पा मोरया



रत्नप्रभा

 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page